breaking-newsमहाराष्ट्र

‘महावेध’ देणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती

मुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ यानावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नुकसान कसे टाळावे याचे तंत्र शेतकऱ्यांना सहज साध्य होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक अशी 2060 स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन केली असून त्याद्वारे गावस्तरापर्यंतच्या शेतकऱ्याला हवामानाचा अचूक अंदाज आणि माहिती प्राप्त होणार आहे. हवामानाशी संबंधित सूचना आणि अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने अशी एक विकेंद्रित व्यवस्था उभी करण्याची ही संकल्पना होती असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सध्याची हवामानविषयक यंत्रणा संपूर्ण राज्यातील हवामानाची एकत्रित माहिती देण्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर हवामानाचे अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ,एखाद्या गावात काही भागात पाऊस तर लगतच्या गावात मात्र कोरडे हवामान एकाच वेळी आढळते. या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे हवामानाशी संबंधित परिपूर्ण आणि अचूक माहिती मिळणार आहे. हवामानाची खरी स्थिती वेळेआधी प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना पावसाचा, गारपीटीचा अंदाज आधीच मिळेल आणि त्यानुसार ते संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना करू शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपल्या राज्यात शेती हवामानावर आधारित आहे. गेल्या काही वर्षातील हवामानातील वाढत्या बदलामुळे अवेळी पाऊस, गारपीट, वादळ, यांचा तडाखा पिकांना बसून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे.  ही स्वयंचलित हवामान यंत्रणा स्कायमेट या हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी तत्वावर बसविण्यात आली आहे. सध्या राज्यात हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या आठ मोठ्या कंपनी आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून हवामानाविषयी सर्वसाधारण माहिती आणि अंदाज वर्तविले जातात,असे फडणवीस यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button