महाराष्ट्र दिनापासून डॉ. कोल्हे पुन्हा मालिकेच्या चित्रीकरणामध्ये

पिंपरी : निवडणूक प्रचाराची महिनाभराची धावपळ संपल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी मुंबईला जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. नेतेपदाची झूल बाजूला ठेवून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोल्हे आता अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये जाणार आहेत. ‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ या मालिकेच्या चित्रीकरणाचे काम सुरू करणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
प्रचाराची धावपळ संपल्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी हडपसर येथे मुक्काम केला. मंगळवारी थोडेसे उशिराने म्हणजे आठ वाजता ते तयार झाले. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमधील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी एकूण मतदानाचा आढावा घेतला. सर्वाचे मनापासून आभार मानून कोल्हे दुपारी कुटुंबीयांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
मतदान संपल्यानंतर सोमवारी उशिरापर्यंत पक्षाच्या नेत्यांशी भ्रमणध्वनीवरून आणि कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून डॉ. कोल्हे यांनी हडपसर येथील निवासस्थानी मुक्काम केला. मंगळवारी सकाळी कोअर कमिटीमधील नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. त्यांच्याकडून मतदानाचा आढावा घेतला. सर्वाची आपुलकीने विचारपूस करून त्यांचे आभार मानले. प्रचारासाठी कष्ट घेतले, त्या सर्वाना धन्यवाद देण्यासाठी त्यांचा प्रवासादरम्यान भ्रमणध्वनीवरून संवाद सुरूच होता.
महिनाभराच्या कालावधीनतर सायंकाळी कुटुंबीयांची भेट घेऊन डॉ. कोल्हे त्यांच्यामध्ये रमले. आता निवडणूक संपली असून बुधवारपासून मी माझ्या अभिनयाच्या क्षेत्रात परतणार आहे.
‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ या मालिकेच्या चित्रीकरणाचे काम सुरू करणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.