महामार्गावर पतीसमोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

राजस्थानमधील अलवर येथे महामार्गावर एका विवाहितेवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधमांनी बलात्कार करतानाचा व्हिडिओ देखील तयार केला असून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या नराधमांनी पीडित विवाहितेला दिली होती.
अलवर जिल्ह्यात राहणारी विवाहिता २६ एप्रिल रोजी तिच्या पतीसोबत तालावृक्ष येथे दुचाकीवरुन जात होती. यादरम्यान थानागाजी- अलवर मार्गावर पाच तरुणांनी त्यांना गाठले. त्यांनी दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला. यानंतर त्यांनी दाम्पत्याला निर्जनस्थळी नेले. तिथे त्यांनी महिलेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. नराधमांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला. या घटनेची वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करु आणि ठार मारु, अशी धमकी नराधमांनी दिली. पाच ते सहा दिवस दाम्पत्याने भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार दिली नाही. मात्र, यानंतरही नराधमांनी पीडित महिलेच्या पतीला फोन करुन धमकी देणे सुरुच ठेवले.
अखेर सोमवारी पीडितेने पोलीस ठाणे गाठले आणि नराधमांविरोधात तक्रार दिली. “नराधम एकमेकांना छोटेलाल उर्फ सचिन, जीतू आणि अशोक या नावाने हाक मारत होते”, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. जवळपास अडीच तास महामार्गालगत हा सर्व प्रकार सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणी अपहरण, बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.