breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापाैर भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
पिंपरी ( महा ई न्यूज ) – माजी महापाैर कै.भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी कामगार परिषदेचे आयोजन केले असून त्या परिषदेत उल्लेखनीय कार्य करणा-या कामगारांचा पुरस्कार देऊन गाैरव करण्यात येणार आहे. या परिषदेला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये दुपारी 3 वाजता होणा-या या परिषदेत खडकी ॲम्युनिशन फॅक्टरीचे बबलू हिरामण चिंचवडे, खोपोली मस्को कंपनी येथील दादा जयवंत गावडे, पिंपरीतील फिनोलेक्स कंपनीचे श्रीकांत संभाजी जाधव, ज्योती उमेश नवघणे (सामाजिक कार्य), स्मिता सुखून जोशी (गायन) यांना गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढाळराव पाटील, सुप्रिया सुळे, अमर साबळे, अनिल शिरोळे, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, सुरेश गोरे, संग्राम थोपटे, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने उपस्थित राहणार आहेत. कामगार नेते अजित अभ्यंकर, सी. श्रीकुमार, अरविंद श्रोत्री, कैलास कदम, मेघा थत्ते, बबन झिंजुर्डे, बाबा कांबळे, विजय पाळेकर, मारुती जगदाळे, उदय भट आदी मार्गदर्शन करणार आहेत.
या कामगार परिषदेत केंद्र व राज्य सरकारने कामगार कायद्यात केलेले बदल, राष्ट्रीय रोजगार वृध्दी मिशन (नीम), आय.टी, संरक्षण खात्यातील, एमआयडीसीतील तसेच इतर क्षेत्रातील संघटीत व असंघटीत कामगारांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा केली जाणार आहे. एच.ए., नीम, संरक्षण खात्यात परकीय गुंतवणूक त्यामुळे कामगारांचे भवितव्य, एमआयडीसीत कामगारांची होणारी फसवणूक, कंत्राटी कामगार, कमवा शिका योजना, ईएसआय योजना, पेन्शन, ग्रॅच्युईटी, महागाई भत्ता, वेतनवाढ करार, व्यवसाय कर, घरेलू कामगार, आयटीमधील कामगार, कामगार आयुक्तालयाशी संबंधीत प्रश्न आदी विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत पिंपरी चिंचवड, मावळ, मुळशी, चाकण, हिंजवडी परिसरातील सर्व कामगार संघटनांचे प्रतिनिधी व कामगारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन परिषदेचे स्वागताध्यक्ष माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.