महापालिकेच्या शाळेतील सेमी इंग्रजीचे 39 वर्ग बंद ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

पिंपरी – महापालिका शाळांमधील पटसंख्या टिकविण्यासाठी पाच वर्षांपूर्वी ८० शाळांमध्ये ‘सेमी इंग्रजी’चे वर्ग सुरू करण्यात आले; परंतु केवळ अन् केवळ शिक्षकांच्या उदासीनतेमुळे त्यातील ३९ वर्ग बंद पडले आहेत.
गेल्या काही वर्षांत पालकांचा मुलांना इंग्रजी शाळेत पाठविण्याचा कल वाढल्याने महापालिकेच्या मराठी शाळांची पटसंख्या घटू लागली. त्यावर उपाययोजना करताना शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी हरी भारती यांनी २००८ मध्ये महापालिकेच्या ९० शाळांमध्ये ‘पाचवीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग’ सुरू केले. त्यानंतर माजी सभापती फजल शेख यांनी २०१२ मध्ये ८० शाळांमध्ये पहिली ते सातवी सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले. आजच्या घडीला त्यातील ४१ शाळांमध्ये काहीच वर्गांना सेमी इंग्रजीतून शिकवले जात आहे.
सेमी इंग्रजी वर्गासाठी लाखो रुपये खर्च करून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. शिक्षकांना सेमी इंग्रजीतून गणित, विज्ञान हे विषय शिकविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, शिक्षकांच्या अनास्थेमुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
– बी. एस. आवारी, प्रशासन अधिकारी, महापालिका