Views:
135
भाजपकडून आठ सदस्यांचे अर्ज दाखल ः 27 एप्रिलला होणार घोषणा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी भाजपकडून उमेदवारांचे अर्ज त्या-त्या क्षेत्रीय अधिका-यांकडे आज (सोमवारी) दाखल करण्यात आले. या निवडणूकीत विरोधी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाकडून एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आठही प्रभाग समिती अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार असून त्यावर भाजपचे वर्चस्व राहणार आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या आठ प्रभाग समिती अध्यक्षांची मुदत एप्रिलअखेर संपणार आहे. त्यांच्या जागी नविन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.त्या अगोदर प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्या प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदांची निवडणूक येत्या शुक्रवारी (दि. 27) होणार आहे. याकरिता आज (सोमवारी) अ – अनुराधा गोरखे, ब – करुणा चिंचवडे, क – नम्रता लोंढे, ड – शशिकांत कदम, ई – भीमाताई फुगे, फ – कमल घोलप, ग – बाबासाहेब त्रिभूवन आणि ह – अंबरनाथ कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. यामध्ये भाजपचे 77, राष्ट्रवादी कॅाग्रेसचे 36, शिवसेनेचे 9, अपक्ष 5, मनसेचे 1 असे एकूण 128 नगरसेवक आणि स्विकृत 5 नगरसेवक अशी 133 संख्याबळ आहे. महापालिकेच्या तौलनिक संख्याबळाच्या आधारावर आठही प्रभाग समितीवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. तसेच विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॅाग्रेसने एकही अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या निवड बिनविरोध निश्चित मानली जात आहे.
Like this:
Like Loading...