महापालिकेचे क्रीडा सभापती फरार झाल्याने समिती बैठक लांबणीवर

पिंपरी – सत्ताधारी भाजपचे प्रभाग क्रमांक 11 मधील महापालिकेचे क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती संजय नेवाळे यांच्यावर निगडी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच पोलिसांच्या दप्तरी ते फरार दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या क्रीडा समिती आज (शुक्रवारी) होणारी पाक्षिक सभा कोणतेही सबळ कारण नसताना तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, सभापती हजर नसताना गणसंख्येचा मुद्दा पुढे करुन ही सभा तहकूब केल्याचे नगरसचिव कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा आज (शुक्रवारी) आयोजित करण्यात आली होती. त्यानूसार समितीचे काही सदस्य बैठकीला येणार होते. परंतू, नगरसचिव कार्यालयाकडून संबंधित समिती सदस्यांना फोन करुन पाक्षिक सभा तहकूब झाल्याचे कळविण्यात आले. प्रत्येक सदस्यांना केवळ गणसंख्येअभावी सभा तहकूब केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, महापालिका क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे यांच्यावर चिखलीतील एका दुकानदाराला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. निगडी पोलिसांना ते चाैकशीला सापडत नसल्याने त्यांनी त्यांच्या दप्तरी फरार असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे क्रिडा सभापतीच्या गैरहजरीमुळे ही सभा तहकूब करण्यात आली आहे.