महापालिकेचा पुरनियंत्रण आपत्ती निवारण कक्ष सुरु ; प्रभागातही चोवीस तास अधिका-यांची नियुक्ती

पिंपरी – अतिवृष्टी किंवा धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास नदीकाठच्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. ही स्थिती हाताळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत पूरनियंत्रण आपत्ती निवारण कक्ष सुरू केला असून, आठ प्रभाग कार्यालयातही कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशामक विभागाच्या वतीने ‘पूर नियंत्रण आराखडा 2018’ तयार करण्यात आला आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी आज (शनिवारी) बैठक झाली. प्रभारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रवीण अष्टीकर यांनी सर्व विभागाचा आढावा घेऊन जिवीत व वित्तहानी होऊ नये याची दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन केले. सह शहर अभियंता आयुबखान पठाण, क्षेत्रिय अधिकारी मंगेश चितळे, संदीप खोत, अण्णा बोदडे, विजय खोराटे, नितीन कापडनीस, मनोज लोणकर, स्मिता झगडे, आशा राउत, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, कार्यकारी अभियंता मकरंद निकम, रामदास तांबे, संजय भोसले उपस्थित होते.
पवना व मुळशी धरण भरल्यानंतर विसर्ग केला जातो. यामुळे नदीकिनारच्या वस्त्यांत पाणी शिरते. अशा वेळी पूरनियंत्रण आपत्ती निवारण कक्ष प्रभाग कार्यालयांना मदतीबाबत सूचना करते. पावसाळाच्या कालावधीत 1 जून ते 30 सप्टेंबर 2018 पर्यंत आपत्कालीन परस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये ‘मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्षा’ची आणि आठही क्षेत्रिय कार्यालयांमध्ये देखील ‘पूरनियंत्रण कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये 24×7 या तत्वार अधिकारी, कर्मचा-यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी संक्रमण ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्याठिकाणी अत्यावश्यक सोई सुविधा पुरविण्याबाबत क्षेत्रिय अधिका-यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशामक विभागही सज्ज असून त्यांनी पूर नियंत्रण साहित्य तयार ठेवले आहे. त्यामध्ये लाईफ रींग्स, लाईफ जॅकेट्स, रबर बोट, रोप, गळ, विमोचन साहित्य, मोठी दोरी, जवानांची पथके तयार ठेवली आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवना धरण व मुळशी धरण येथील पाण्याची पातळी व होणारा विसर्ग याची माहिती धरणांवरील कर्मचा-यांच्या संपर्कात राहून घेणार आहेत. आपत्ती निवारण कक्षातील अधिकारी व कर्मचा-यांचा व्हॉट्सअॅप ग्रुपही तयार केला आहे. पुर परस्थितीच्या वेळी नदीकाठी असलेल्या वस्तीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावयाची व्यवस्था क्षेत्रिय कार्यालया स्तरावर करण्यात आली आहे. नदीकाठी असलेल्या रहिवाश्यांना पाण्याच्या पातळीचे व संभाव्य धोक्याची ध्वनीक्षेपनावरुन माहिती देऊन वेळेत सावध करणे. अग्निशामक दल, स्थानिक नागरीक, हो़डीधारकांचे मदतीने बाधित रहिनाश्यांना मदत करणे. आवश्यकतेनुसार लष्कर, एनडीआरफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व पोलीस यंत्रणा यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती गावडे यांनी दिली.
पवना धरणातील पाण्याचा विसर्ग व अतिवृष्टीमुळे ‘अ’, ‘ब’, ‘ड’ , ‘ई’, ‘फ’ , ‘ह’ या क्षेत्रिय कार्यालय परिसरातील भाग दरवर्षी पाणीखाली येतो. ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय परिसरातील पवना नदिकाठावरील माता रमाबाई, भाटनगर, बौध्दनगर, ‘ब’ कार्यालय परिसरातील केशवनगर, मोरया गोसावी मंदिर परिसर, ‘ड’ मधील पिंपळेगुरव परिसर, ‘ई’ बोपखेल गावठाण, ‘फ’ पिंपरी, संजय गांधीनगर, रहाटणी, ‘ह’ मधील मधुबन सोसायटी, संगमनगर, ममतानगर, दापोडी बौध्दविहार, स्मशानभुमि नदीकाठचा परिसर, पवनावस्ती परिसर आदी भाग दरवर्षी पाण्याखाली जातो. त्यामुळे या भागात अधिक दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पूरबाधित नागरिकांना स्थलांतरित करून त्यांना निवास, भोजन व पाणी आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.