महापालिका गटनेत्यांच्या शिष्टाईला यश, मेट्रोच्या कर्मचा-यांना मिळाले वेतन

- कामगारांचे राजीनामेही मंजुर करुन घेतले
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी ते खडकी रेंजहिल्सपर्यंत मेट्रो स्टेशनचे काम करणा-या कामगारांनी पगारासाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण शुक्रवारी (दि.3) मागे घेतले. महापालिकेतील गटनेत्यांच्या शिष्टाईला यश आले असून या कामगारांना संबधित ठेकेदाराने तिन महिन्यांच्या पगाराचे धनादेश अदा केले आहेत.
महामेट्रोने मेट्रो स्टेशन उभारण्याचे काम एचसीसी व अलफरा प्रा. लि. या ठेकेदारी कंपनीला कंत्राट दिले. या कंपनीकडून काम बंद करण्यात आले. तसेच, कामावरील कामगारांचे पाच महिन्यांचा पगार दिला नाही. कामगारांनी बुधवार (दि.1) पासून वल्लभनगर येथे ठेकेदारा्चाय साईट ऑफीसमोर बेमुदतउपोषण सुरू केले होते. या कामगारांच्या आंदोलनाला महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पाठिंबा दिला. तसेच, कंपनीकडे पगार देण्याची मागणी केली.
त्यांनी ठेकेदारी कंपनीचे अधिकारी व महामेट्रो अधिका-यांशी चर्चा केल्यानंतर अखेर ठेकेदारी कंपनीने कामगारांना पगार देण्याचे मान्य केले. एकूण 70 कामगारांना तीन महिन्यांचा पगाराचे धनादेश देण्यात आले. त्यानंतर कामगारांनी उपोषण मागे घेतले. मात्र, ठेकेदार कंपनीने रखडलेला पगार देण्याचे आश्वासन देत कामगारांचे राजीनामेही मंजूर करून घेतले आहेत.