महापालिका कामगारांची पिंपरीत उद्या राज्यस्तरीय बैठक

पिंपरी – राज्यभरातील सर्व महापालिका व नगरपालिकेतील कामगार संघटनांच्या प्रमुख पदाधिका-यांची राज्यस्तरीय बैठक शनिवारी (दि.9) पिंपरीत आयोजित केली आहे, अशी माहिती महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली आहे.
संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य सभागृहात शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ही बैठक होणार आहे. यावेळी कामगार नेते रवी राव, शशांक राव यांच्यासह राज्यभरातील महापलािका संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये प्रामुख्याने कामगार कायद्यात करण्यात आलेले बदल व प्रस्तावित बदल, आकृतीबंद, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, अनुकंपा, वारसा हक्क धोरणातील जाचक अटी रद्द करणे, रिक्त व पदोन्नती पदे भरणे, कंत्राटीकरण – खाजगीकरण, कंत्राटी कामगारांना कायम करणे, समान कामाला समान वेतन देणे. या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुन आगामी काळात कामगार संघटनांचा राज्यव्यापी लढा उभारण्याबाबत ठराव मंजूर करुन ध्येय धोरणे आखण्यात येणार आहेत, असे बबन झिंजुर्डे यांनी म्हटले आहे.