महापालिकेत सहाय्यक आयुक्तांमध्ये खांदेपालट
– प्रवीण आष्टीकर एक महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीवर गेल्याने कामकाजाचे वाटप
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त डॅा. प्रवीण आष्टीकर हे वैद्यकीय कारणास्तव एक महिन्यांच्या प्रर्दीर्घ सुट्टीवर गेले आहे. त्याच्याकडे असणारा निवडणूक, भांडार विभागासह अन्य विभागाच्या कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले. त्यामुळे सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांच्याकडे निवडणूक विभाग, मनोज लोणकर यांच्याकडे भांडार विभाग आणि आशा राऊत यांच्याकडे क्रीडा विभाग सोपविण्यात आला आहे, असा आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आज (सोमवारी) प्रसिध्द केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त आणि निवडणूक,भांडार विभागाचा पदभार असलेले सहायक आयुक्त डॅा.प्रवीण आष्टीकर एक महिन्याच्या प्रदिर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे महापालिकेचे दैनंदिन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानूसार आकाश चिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि ‘ड’ कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी विजय खोराटे यांच्याकडे निवडणूक विभागाची जबाबदारी दिली आहे. ‘फ’ क्षेत्रिय आणि आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
महापालिका प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडील क्रीडा विभाग कमी करण्यात आला आहे. प्रशासन अधिकारी असलेल्या ‘ह’ कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत यांच्याकडे क्रीडा विभागाची धुरा देण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहायक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल केले परिपत्रकांत म्हटले आहे.