महत्त्वाकांक्षी योजनेतून मास्टरकार्डची माघार

- “मील्स फॉर गोल्स’ योजनेला अखेर स्थगिती
साओ पावलो – रशियात येत्या 14 जून रोजी सुरू होत असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेली “मील्स फॉर गोल्स’ ही महत्त्वाकांक्षी मास्टरकार्ड या अग्रगण्य क्रेडिट कार्ड समूहाने अखेर मागे घेतली आहे.
या योजनेअंतर्गत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत लिओनेल मेस्सी आणि नेमार (ज्युनिअर) यांनी केलेल्या प्रत्येक गोलमागे मास्टरकार्डतर्फे 10,000 गरजूंना विनामूल्य भोजन दिले जाणार होते. मात्र या योजनेला विविध स्तरांवरून विरोध झाल्यामुळे मास्टरकार्डने ही योजना मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मास्टरकार्ड ही जगातील अव्वल क्रेडिट कार्ड कंपनी असून मेस्सी आणि नेमार या दोन्ही खेळाडूंचे ते प्रायोजक आहेत. या योजनेमुळे मेस्सी व नेमार यांच्यावर अतिरिक्त दडपण येण्याची शक्यता संबंधित संघांच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली होती.
ब्राझिलियन फुटबॉल महासंघाने या योजनेला विरोध करताना म्हटले होते की, फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ब्राझिल अथवा अर्जेंटिनाच्या कोणत्याही खेळाडूने गोल केला तरी गरजूंना अन्नदान केले जाईल, असे जाहीर केले असते, तर ही योजना निश्चित यशस्वी झाली असती. तसेच लिओनेल मेस्सी आणि नेमार या दोन खेळाडूंवरील दडपणही दूर झाले असते. जर त्यांना खरोखरीच गरजूंना अन्नदान करण्याची योजना हाती घ्यायची असेल, तर त्यांनी गोल करण्याची अट काढायला हवी आणि कोणत्याही अटीशिवाय त्यांनी ही योजना यशस्वी करून दाखवायला हवी.
या योजनेअंतर्गत मास्टरकार्डने आतापर्यंत जवळपास 4 लाख गरजूंना अन्न वाटप केले आहे. ही योजना मार्च 2020 पर्यंत असल्याने अनेकांनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. मुख्य म्हणजे ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे यांनी या योजनेला टीकेचे लक्ष्य केले होते. त्यामुळे मास्टरकार्डला माघार घेणे भाग पडले. मास्टरकार्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या ही योजना मागे घेण्यात आली असली, तरी भविष्यात हे दोन्ही खेळाडू आम्हाला अशा प्रकारच्या अन्य योजनांसाठी निश्चितपणे मदत करतील.