मला हिंदूंच्या भावना दुखवायच्या नव्हत्या; ‘त्या’ दृश्यांबद्दल प्रियांकाची माफी

नवी दिल्ली: अमेरिकन टेलिव्हिजनवरील ‘क्वांटिको’ या लोकप्रिय मालिकेच्या वादग्रस्त कथानकावरून अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. ‘क्वांटिको’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या काही भागांमध्ये दहशतवादी असलेली भारतीय पात्रे दाखविण्यात आली होती. यावरून बराच वादंग झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रियांकाने रविवारी ट्विट करून स्पष्टीकरण दिले.
तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘क्वांटिको’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागांतील चित्रणामुळे काही समुदायांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यासाठी मी क्षमस्व आहे. अशाप्रकारे कोणाच्याही भावना दुखावणे हा माझा हेतू नव्हता. त्यामुळे मी मनापासून सर्वांची माफी मागते. मला भारतीय असल्याचा सार्थ अभिमान आहे आणि ही भावना कदापि बदलणार नाही, असे प्रियांकाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
१ जून रोजी प्रसारित झालेल्या ‘क्वांटिको’च्या भागात एमआयटीतील एक प्राध्यापक मॅनहॅटनमध्ये पार पडत असलेल्या भारत- पाकिस्तान परिषदेवर अणुबॉम्बने हल्ला करण्याचा कट रचत असल्याचे दाखवण्यात आले होते. हा प्राध्यापक भारतीय असून पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी परिषदेवर दहशतवादी हल्ला करणार असल्याचे चित्रण करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.