‘मराठी बिग बॉस’मध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री

दिवसेंदिवस कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्ये रंगत येत आहे. नुकतंच अभिनेता राजेश शृंगारपुरे बिग बॉसच्या घरातून आऊट झाला आहे. राजेशची बातमी ताजी असतानाच, आता बिग बॉसच्या घरात आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत बिग बॉसच्या घरात येणार असल्याची चर्चा आहे. तशी विचारणा शर्मिष्ठाला कलर्सकडून करण्यात आली आहे.
गेल्याच आठवड्यात अभिनेत्री हर्षदा खानविलकर ही सुद्धा वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात आली आहे. त्यानंतर आता अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतही तशीच एण्ट्री करण्याची शक्यता आहे. ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत शर्मिष्ठा राऊतने साकारलेली नीरजाची भूमिका प्रचंड गाजली होती. यात ती नकारात्मक भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ती ‘उंच माझा झोका’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकांमध्येही झळकली.
शर्मिष्ठाने योद्धा, नवरा माझा भोवरा यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तर शेखर फडकेसोबत तिने ‘जो भी होगा देखा जायेगा’ हे विनोदी नाटकही केलं होतं. यानंतर ‘कॉमेडीची जीएसटी एक्स्प्रेस’मध्ये तिने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं.