पुणे
मराठा समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी 10 मे रोजी अर्धनग्न मोर्चा

पिंपरी: सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 10 मे रोजी पुण्यात अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात 2 ते 3 हजार तरूणांचा अर्धनग्न अवस्थेत समावेश असेल, अशी माहिती सकल मराठा समाजाचे प्रा. संभाजी भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मोर्चाला पुण्यातील गोखले इंस्टिट्यूट येथून सुरवात होणार असून कलेक्टर ऑफीस येथे याचा समारोप होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असून मुख्यमंत्री मराठा समाजाच्या भावनांची कदर न करता समाजाला वेठीस धरत आहेत. सरकारकडे वारंवार मागण्या लाऊन धरूनही आजपर्यंत त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आगामी काळात तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी राज्यभर आरक्षण व महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.
येत्या 2 ते 9 मे या काळात हिंगोली, वाशीम, यवतमाळ, परभणी, नांदेड या जिल्ह्यात आरक्षण सभा व बैठका होणार आहेत. त्यानंतर 10 मे रोजी पुण्यात अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार आहे. 11 मे पासून महाराष्ट्रातील इतर शहरात दुस-या टप्प्यातील सभा व बैठका होणार आहेत. यानंतर 30 मे रोजी मराठा सामाजाच्या मागण्या घेऊन मुंबईतील आझाद मैदान ते मंत्रालय असा मुकमोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर करेपर्यंत आमरण उपोषणास करणार असल्याचे प्रा.संभाजी पाटील यांनी सांगितले.