breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मनुवादी विषमतेवर आधारीत व्यवस्था संपवण्यासाठी भारतीय संविधानाचा स्वीकार – डॉ. बाबा आढाव

– पुण्यात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या स्मृतींना अभिवादन सभा

पुणे । प्रतिनिधी

भारतीय समाज दुहेरी व्यवस्थेत जगतो. दैनंदिन व सामाजिक जीवनात तो चातुर्वर्ण्यावर आधारित मनूची व्यवस्था जगत असतो. तर कायदेकानू, नियम यासाठी संविधानावर आधारलेली व्यवस्था त्याला लागू होते. मात्र मनुवादी व्यवस्था आणि संविधान हे एकाच वेळी एकत्र वाटचाल करू शकत नाहीत. मनुवादी विषमतेवर आधारीत व्यवस्था संपवण्यासाठी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला आहे. मात्र संविधान केवळ पुस्तकातच रहात आहे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये संविधानाची मूल्य उतरली पाहिजेत. मनुवादी व्यवस्था बदलण्यासाठी टीका केलीच पाहिजे, मात्र त्याचबरोबर आपणही आपल्या जगण्यात सत्यशोधनाचा विचार स्वीकारला पाहिजे असे प्रतिपादन कष्टकऱ्यांचे नेते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज बालगंधर्व रंगमंदिर येथे आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी डॉक्टर विमालकिर्ती, जमात-ए-इस्लामी चे सय्यद अश्रफी, राष्ट्र सेवा दलाचे विलास किरोते, सत्यशोधक कष्टकरी शेतकरी सभेचे किशोर ढमाले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख ,राष्ट्र सेवा समूहाचे राहुल पोकळे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे मधुकर कांबळे, बामसेफचे पी. डी. बोरकर, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सुभाष वारे, माजी सनदी अधिकारी अनुपम सराफ, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे व एस.एम.मुश्रीफ, इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे, पंजाबहून आलेले शेतकरी आंदोलनाचे नेते सज्जन कुमार, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या लता भिसे, लोकशासन संघटनेचे राजेंद्र गायकवाड, लोकायतचे नीरज जैन आदींची यावेळी आदरांजली वाहिली.

बाबा आढाव म्हणाले की, संविधानाने स्विकारलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, विज्ञाननिष्ठा इ. मूल्यांचे चिंतन व प्रसार होणे आवश्यक आहे. मात्र इथली प्रस्थापित व्यवस्था ते होऊ देत नाही. आकाशवाणीवर पहाटे ऐकवलं जाणार चिंतन हे त्याचं ठळक उदाहरण आहे. या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये सांगितले गेलेल्या मूल्यांचा प्रसार झाला पाहिजे.

सभागृहात मोठ्या संख्येने आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींचया उपस्थितीकडे लक्ष वेधून डॉ. आढाव म्हणाले, या उपस्थितीवरून न्यायमूर्ती सावंत हे सर्व घटकांना किती आधार वाटत होते आणि आपापसात मतांतरे असतानाही त्यांचा शब्द अंतिम वाटत होता हे स्पष्ट होत आहे.

अभिव्यक्तीच्या अलका जोशी यांनी प्रस्तावना केली. मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्याच्या प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली आली आणि आम्ही प्रकाश बीजे पेरीत चाललो या गीताने न्यायमूर्ती सावंत यांच्या विचारांची ज्योत पुढे नेण्याचा निश्चय करण्यात आला. नितीन पवार यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले. न्या. सावंत व गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली अर्पण करून सभेची सांगता झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button