breaking-newsराष्ट्रिय

मनसेप्रमाणे राष्ट्रवादीची अवस्था होईल – फडणवीस

नाशिकचा विकास आपण केल्याचे सांगणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला जनतेने घरी का बसवले?, स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभेत मनसेचा कोणीही प्रतिनिधी नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष, आमची शाखा कोठेही नाही, अशी मनसेची अवस्था असल्याची खिल्ली उडवत लवकरच त्याप्रमाणे राष्ट्रवादीचीही स्थिती होणार असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. नोटाबंदीने राज ठाकरे यांचे दुकान बंद पडले. यामुळे ते त्या विरोधात गळा काढत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कारागृहात राहिलेले छगन भुजबळ हे सध्या जामिनावर आहेत. लवकरच त्यांचा खटला सुरू होईल. पुढे काय काय होईल ते पाहावे, असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ शनिवारी दुपारी रणरणत्या उन्हात जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. याच मैदानावर आदल्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली होती. समारोप सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे वेगवेगळे व्हिडिओ सादर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मनसेच्या कार्यकाळात नाशिकच्या झालेल्या विकासाकडे लक्ष वेधले होते. राज यांच्या सभेला महायुतीने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उत्तर दिले. कुंभमेळ्यात नाशिक शहरात जी विकास कामे झाली, त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार कोटींचा निधी दिला होता, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. महापालिका निवडणुकीत आपण शहराला दत्तक घेतले. दोन वर्षांत दोन हजार कोटींची कामे, प्रकल्प मांडून शहराच्या विकासावर भर दिला. या कामांची लांबलचक यादी मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखविली. विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी शहरात ‘हायब्रीड मेट्रो’चे भूमीपूजन करण्यात येईल. लवकरच शहरात महापालिकेची इलेक्ट्रीक बस सेवा सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसेचे इंजिन सध्या शरद पवार यांनी भाडय़ाने घेतले आहे. हे इंजिन तोंडाच्या वाफेवर चालते. पण, त्या इंजिनासारखीच राष्ट्रवादीची अवस्था होणार असल्याचा टोला लगावला. राज यांनी आपल्या भाषणात भुजबळांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित करत पुढे काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. हा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांसारखा नटसम्राट महाराष्ट्राने पाहिलेला नसल्याचे सांगितले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले. न्यायालयात लवकरच खटला सुरू होईल. पुढे काय काय होते, ते पाहत रहा, असे त्यांनी सूचित केली. भारतीय सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नेत्यांना क्षेपणास्त्राला बांधून पाठवायला हवे होते, असा उपरोधीक टोला त्यांनी लगावला.

भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

महाराष्ट्र सदनच्या कामात शासनाचा एक रुपया खर्च केल्याचे किंवा एक इंच चटईक्षेत्र दिल्याचे सिद्ध करावे, आम्ही आमची उमेदवारी मागे घेण्यास तयार आहोत अन्यथा तुम्ही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खाली करावी, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानांवर भुजबळांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी दादागिरी करू नये. कारण न्यायव्यवस्था अजून जिवंत आहे. न्यायालय काय आहे ते ठरवेल. बनावट गुन्हे आणि खोटे आरोप करणाऱ्यांना कारागृहात टाकण्याची तरतूद आहे. मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणात आपल्यावर बनावट आरोप ठेवत आपला आवाज बंद करण्यासाठी तुरुंगात टाकण्यात आले होते. आम्ही निदरेष असल्याची खात्री असल्याने आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दमबाजी करण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button