मध्य प्रदेशात बोगस मतदार नसल्याचा निवडणूक आयोगाचा दावा

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात बोगस मतदार आढळून आले नसल्याचे निवडणूक आयोगाच्या पथकांच्या पाहणीतून समोर आले आहे. राज्यात ६० लाख बोगस मतदार असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यानंतर आयोगाने या प्रकरणी तपासासाठी दोन पथकांची नियुक्ती केली होती. मात्र, बोगस मतदारांबाबत या पथकांना काहीही माहिती मिळाली नाही.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर प्रकरणातील वास्तव जाणून घेण्यासाठी आयोगाने दोन पथकांची नियुक्ती केली होती.
एका पथकाने नरेला आणि भोजपूर विधानसभा मतदारसंघात तपास केला, तर अन्य पथकाने होशंगाबाद आणि सेवनी- मालवा मतदारसंघात कागदपत्रांची पाहणी केली. ही पथके ४ जून रोजी मध्य प्रदेशात दाखल झाली होती. एका अधिकाºयाने सांगितले की, २०१६मध्ये ६८ लाख बनावट मतदारांची ओळख निश्चित करण्यात आली होती. बहुधा याच नोंदींचा तक्रारीत उल्लेख असावा. त्यानंतर बहुतांश प्रकरणांत नोंदी दुरुस्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या त्रुटी दूर करण्यात येतील.