…मग कावड यात्रेला आक्षेप का?: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनऊ : ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण करणं बरोबर असेल तर कावडियांच्या यात्रेच्या वेळी डान्स करण्यावर, गाणं आणि डीजे वाजवण्यावर बंदी कशी काय लागू शकते?, असा सवाल स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला. सायंटिंफिक कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मागच्या सरकारने जन्माष्टमीच्या आयोजनावर बंदी घातली होती यावर योगी म्हणाले की, नमाज पढण्यासाठी कुठंही स्वातंत्र्य असेल तर पोलीस ठाण्यात जन्माष्टमी साजरा करण्यावर कसे काय प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात? सर्व जाती धर्माच्या लोकांना सण-उत्सव साजरा करण्याचं स्वातंत्र्य आहे. ख्रिसमस साजरा करा किंवा नमाज पठण करा, काहीही करा, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून करा, असं योगी म्हणाले. ‘अंत्योदय की ओर’ या विशेषकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर अवैध कत्तलखान्यावर बंदी घालण्यात आली तसेच कावडियांना सुरक्षा देण्यात आली, असंही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितलं.
उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचं गुणगाण गाताना योगी आदित्यनाथ म्हणाले, या कर्जमाफीसाठी कोणताही अतिरिक्त फंड गोळा केला नाही. केवळ काही योजनांमधील खर्च वाचवून कर्जमाफीची व्यवस्था केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र भदौरीया होते. राजर्षि टंडन मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू एमपी दुबे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.