breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील जेवण झाले बंद..!

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी मुक्कामी थांबणाऱ्या रुग्णांना जेवण व सकाळी चहा, नाष्टा मोफत दिला जात होता. पण जेवण पुरविणार्या महिला बचत गटाचे चार महिन्याचे पावणे तीन लाख रुपयाचे बिल थकले आहे. दुकानदाराने उधारीवर किरणा माल देण्यास नकार दिला. त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी गेल्या आठ दिवसापासून रुग्णांचे जेवण बंद केले आहे. उपचार घेणाऱया रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. स्वच्छता कर्मचारी व धोबीही पगार मिळत नसल्याने काम सोडून निघून गेले आहेत. रुग्णालयात अस्वच्छतेचे प्रमाण वाढलेले असून, कपड्याचे ढीग पडून आहेत. अस्वच्छतेमुळे डॉक्टर व परिचारिकांनाही नाक मुठीत धरूनच काम करण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.

येथील रुग्णालयात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातून दररोज ३५० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यापैकी १०० हून अधिक रुग्ण लहान मोठ्या शास्रक्रीयामुळे तीन ते चार दिवस येथे थांबतात. घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील शास्रक्रीया गृहाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे त्या रुग्णालयातील रुग्नांचीही संख्या मंचर उपजिल्हा रुग्णालयात वाढली आहे. रेणुका महिला बचत गटामार्फत जेवण व नाष्टा पुरविला जातो. औंध येथील सामान्य रुग्णालयातून बचत गटाला, स्वच्छता कामगारांना व धोब्याला रक्कम देण्याची तरतूद केली आहे. स्वच्छता कामगारांचे चार महिन्यापासूनचे पगार रखडलेले आहेत. त्यामुळे कामगार कामावर येत नाहीत. स्वच्छता गृहातून दुर्गंधी सुरु झाली आहे. त्याचा त्रास डॉक्टर, परिचारिका व रुग्णांना होत आहे. त्यातून आजार बळवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बाळंतपणाच्या रुग्णासाठी वापरलेल्या व अस्वच्छ झालेल्या कपड्यांचा ढीग पडून आहे. बाळंतपणाच्या रुग्नानाही मिळणारी सेवा बंद होण्याची शक्यता आहे. औंध येथील सामान्य रुग्णालयातील प्रशासनाच्या ठिसाळ कारभारामुळेच नावलौकिक प्राप्त केलेले मंचरचे उपजिल्हा रुग्णालय अडचणीत येण्याच्या मार्गावर आहे.

रेणुका महिला बचत गटाच्या अध्यक्षा अरुणा टेके म्हणाल्या, ‘निधी उपलब्ध असूनही औंध येथील सामान्य रुग्णालयातून बिल अदा करण्याबाबत टाळाटाळ केली जाते. अनेक हेलपाटे मारले पण उपयोग झाला नाही केवळ आश्वासने दिली जातात. उधारीवर किरणा माल खरेदी करून जेवण तयार केले जाते. दुकानदारांनी तगादे सुरु केले आहेत. त्यामुळे बचत गटातील महिला त्रस्त झाल्या आहेत.’ याबाबत मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सीमा देशमुख म्हणाल्या, ‘औंध येथील सामान्य रुग्णालयात रेणुका बचत गटाचे बिल पाठविले आहे. सदर रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button