breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत आले आहेत आमदारांचे आमदार… पैलवान आमदार हे ‘वादळ’ रोखणार?

  • भोसरी विधानसभेच्या आखाड्यात राजकीय धुरळा
  • माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपाटले 

पिंपरी। (अमोल शित्रे) – भोसरी विधानसभा निवडणुकीतील पराभव झाल्याने गेली साडेतीन वर्षे राजकीय अज्ञातवासात गेलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे अचानक आक्रमक झाले आहेत. वाढदिवसाचे निमित्त साधून भोसरीत ‘आले आहेत आमदारांचे आमदार…’ असे ‘ब्रँडिंग’ सुरू झाले आहे. त्यामुळे आता ‘प्रथम आमदार’ यांचे ‘वादळ’ रोखण्याचे आव्‍हान पैलवान आमदार महेश लांडगे यांना पेलावे लागणार आहे.

 

वास्तविक, आपल्या बाणेदार नेतृत्वाखाली भोसरीच्या मातीतला कणखरपणा दाखवण्यासाठी माजी आमदार विलास लांडे आता सज्ज झाले आहेत. आपला वाढदिवस साजरा करून भोसरीवर गेल्या साडेतीन वर्षात झालेल्या अन्यायाचा कैवार घेण्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. तशी क्लीप फेसबुकवर व्हायरल झाल्याने भोसरीसह शहराच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

 

माजी आमदार विलास लांडे यांचा वाढदिवस उद्या शुक्रवारी (दि. 1) साजरा होत आहे. उद्यापासून त्यांनी भोसरीच्या विकासाचा प्रश्न समोर ठेवून काम करणार असल्याची साद घातली आहे. तशी व्हिडीओ क्लीप तयार करून त्यांनी फेसबुकद्वारे व्हारयल केली आहे. पुन्हा कणखर नेतृत्व हवं भोसरीच्या मातीला… आता कोण रोखणार हे वादळ…, येत आहेत आमदारांचे आमदार… अशी साद व्हिडीओ क्लीपमधून घालण्यात आली आहे. या क्लिममुळे भोसरीच्या राजकारणात खळबळ माजली आहे. कारण, गेली साडेतीन वर्षे शांततेत राहिल्याने अचानक विलास शेठ यांनी क्लीपद्वारे भोसरीच्या विकासाची साद घातल्याने लांडे यांच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

राजकीय चर्चेला उधाण

सोशल मीडियावर व्‍हायरल झालेल्या या क्लिपचा अर्थ काढल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांमध्ये भोसरी विधानसभा मतदार संघाचा काडीमात्र विकास झाला नाही, असाच अर्थ स्पष्ट होतो. सध्याचे भोसरीचे नेतृत्व दमदार आहे, मात्र, कणखर नाही, असा मतितार्थ निघतो. त्यामुळे लांडे समर्थकांनी ही क्लिप आमदार महेश लांडगे यांना आव्‍हान देण्यासाठीच बनवली असल्याचे दिसते. आमदारांचे आमदार येत आहेत… या शब्दप्रयोगाने राजकीय जाणकारांना बुचकळ्यात टाकले आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बाप माणूस’ असाही शब्दप्रयोग काही ठिकाणी करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भोसरीतील राजकारणावर चर्चेला उधाण आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button