भाषण सुरू असताना गडकरींना पुन्हा भोवळ आली

शिर्डी – राहता येथे प्रचार सभेला संबोधित करत असताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना आज पुन्हा भोवळ आली. मात्र, स्वत:ला सावरत त्यांनी भाषण आटोपते घेतले आणि खुर्चीत जाऊन बसले. त्यांनतर बरे वाटू लागल्यावर साईबाबांचे दर्शन घेऊन ते विमानतळाकडे रवाना झाले. दरम्यान, गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी मुंबईहून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राहता येथे आले होते. सभास्थळी येताच त्यांना दोनदा लिंबू पाणी देण्यात आलं होतं. त्यानंतर इतर वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर सर्वात शेवटी गडकरी मतदारांना संबोधित करण्यासाठी उभे राहिले. सभा सुरू असताना त्यांना तिसऱ्यांदा लिंबू पाणी देण्यात आले. साधारण २५ मिनिटं बोलल्यानंतर भाषणाच्या समारोपाकडे असताना त्यांना अचानक गरगरल्या सारखं झालं आणि अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी अर्ध्यावरच भाषण थांबवलं. कार्यकर्त्यांनीही त्यांना आधार देत खूर्चीवर बसवलं.
अंगरक्षक आणि व्यासपीठावरील नेत्यांनी तातडीने हालचाली करून त्यांना सावरत त्यांना औषध दिलं. त्यानंतर त्यांना पुन्हा लिंबू पाणी देण्यात आलं. काही वेळ बसल्यानंतर मतदार आपल्याकडे पाहत असल्याचं लक्षात आल्यावर गडकरी उठून उभे राहिले आणि मतदारांना हात उंचावून अभिवादन करत निघून गेले. दरम्यान, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं. कडाक्याचं ऊन आणि शुगरचा त्रास यामुळे त्यांना भोवळ आली असावी, असं सूत्रांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कार्यक्रमासाठी गडकरी आले होते. त्यावेळीही त्यांना अशीच भोवळ आली होती.