भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये टिपले सहा घूसखोर दहशतवादी

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) -भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये घूसखोरी करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना टिपले आहे. रविवारी उत्तर काश्मीरच्या केरन (कूपवाडा) विभागात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा घूसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि सहा दहशतवाद्यांना ठार केले. त्यांच्याबरोबर असलेल्या अन्य दहशतवाद्यांना पकडण्याचे प्रयत्न जारी असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली आहे.
रविवारी पहाटे अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज काही दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करताना गस्त घालणाऱ्या जवानांनी पाहिले. शस्त्रे टाकून त्यांना शरण येण्यासाठी लष्कराने पुकारताच त्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल लष्कराने गोळीबार सुरू केला. सुमारे तीन तास चाललेल्या य धुमश्चक्रीत सहा दहशतवादी ठार झाले आहेत. नंतरच्या तपासणीत चर दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराच्या हाती लागले. सन 2018 मध्ये पाकिस्तानने 1,000 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.