भारतीय क्रिकेटच्या भवितव्याबाबत गांगुली चिंतेत

गांगुली हा सध्या बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्षदेखील असून भारतीय क्रिकेट संकटात असून ते कुठल्या दिशेने जातेय, ते अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे. जोहरी यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप कितपत खरे आहेत, ते मला माहिती नाही. मात्र, या प्रकराकडे एकूणच पुरेशा गांभीर्याने पाहण्यात आले नसल्याचे गांगुलीने म्हटले आहे. त्याबाबत गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्ष सी.के. खन्ना, सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांना स्वतंत्र पत्रे लिहिली आहेत.
‘‘हे पत्र मी अत्यंत साशंकतेने लिहीत आहे. भारतीय क्रिकेट प्रशासन नक्की कुठे भरकटले आहे, ते कळेनासे झाले आहे,’’ अशा आशयाचा मजकूर या पत्रात लिहिण्यात आला आहे.
जोहरी याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रिकेट प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय आणि डायना एडल्जी यांनी विभिन्न मते व्यक्त केली आहेत. क्रिकेट प्रशासकीय समितीची सदस्यसंख्या चारवरून घटवून दोनपर्यंत आणण्यात आली आहे. तसेच त्यातदेखील आता दोघांची विभिन्न मते असल्याचे दिसून येत असल्याचे गांगुलीने म्हटले आहे. भारतीय क्रिकेटची बांधणी काही प्रशासकांच्या अथक परिश्रमातून उभी राहिली आहे. खूप परिश्रमपूर्वक करण्यात आलेल्या या व्यवस्थेबाबत मी चिंतेत असून नागरिक याकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा असल्याचे गांगुलीने नमूद केले.