भारताचे मोठे यश; संशोधकांनी शोधला नवीन ग्रह

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संशोधकांना मोठे यश मिळाले आहे. अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या संशोधकांच्या एका पथकाने बाह्य ग्रह शोधला आहे. तो पृथ्वीपासून सुमारे ६०० प्रकाशवर्ष अंतरावर आहे. माऊंट अबू येथील पीआरएलच्या गुरुशिखर वेधशाळेतील १.२ मीटर लांबीच्या दुर्बिणीच्या सहाय्याने या ग्रहाचा शोध लावण्यात आला.
नव्या ग्रहाला एपिक- २११९४५२०१ किंवा के२-२३६ असे नाव देण्यात आले आहे. नेपच्युनपेक्षा मोठ्या आकाराचा हा ग्रह पृथ्वीपेक्षा २७ पट अधिक वस्तुमानाचा आहे. तो आपल्या सूर्यासारख्या एका तार्याभोवती प्रदक्षिणा घालतो. हा ग्रह आपल्या तार्यापासून अतिशय जवळ असून त्याला तार्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी १९.५ दिवस लागतात. याचा अर्थ या ग्रहावरील वर्ष १९.५ दिवसांचेच असते. ग्रहाच्या पृष्ठभागावरील तापमान ६०० अंश सेल्सिअस असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.