breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

भारताकडून श्रीलंकेचा धुव्वा, मालिका जिंकली

कोलंबो : पहिल्या कसोटीत श्रीलंकेची दाणादाण उडवणाऱ्या भारताच्या विराट सेनेनं कोलंबो कसोटीतही दणदणीत विजय साकारत मालिका खिशात टाकली आहे. फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या वीरांना डावाचा पराभव टाळता आला नाही. दिमुथ करुणारत्ने आणि कुसल मेंडिस यांनी शतकी खेळी करून भारतीय गोलंदाजांचा घाम काढला, पण त्यांचे इतर भिडू रवींद्र जाडेजाच्या फिरकीपुढे फारसे टिकू शकले नाहीत. त्यामुळे एक डाव आणि ५३ धावांनी टीम इंडियाने दुसरी कसोटी जिंकली.
चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणेची जिगरबाज शतकं आणि त्यांना चार सहकाऱ्यांनी दिलेली अर्धशतकी साथ या जोरावर पहिल्या डावात ९ बाद ६२२ धावांचा डोंगर उभारून भारतानं डाव घोषित केला होता. त्यापुढे श्रीलंका साफ गळपटली होती. आर अश्विनच्या फिरकीनं त्यांची गिरकी घेतली होती आणि १८३ धावांवर अख्खा संघ गारद झाला होता. भारताकडे ४३९ धावांची भरभक्कम आघाडी होती. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीनं श्रीलंकेवर फॉलोऑन लादला. पुन्हा एकदा यजमानांना झटपट गुंडाळण्याचा टीम इंडियाचा विचार होता. पण, लंकेचे दोन वीर भारताशी भिडले. कुसल मेंडिस आणि करुणारत्ने यांनी झुंजार खेळी करत किल्ला लढवला. डावाचा पराभव टाळण्याच्या इराद्यानेच ते खेळत होते. मात्र, ही जोडी फुटल्यावर जाडेजानं मोठी भागीदारी होऊच दिली नाही. त्यानेच अर्धा संघ तंबूत पाठवल्याने लंकेचा दुसरा डाव ३८६ धावांवर आटोपला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं २-० अशी निर्णायक आघाडी घेतली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button