breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजप मंत्र्याकडे साधी माणूसकी नाही – अजित पवार

पिंपरी –  राज्यात शेतकरी आत्महत्या करतोय, नोकरी नसल्याने बेरोजगारी वाढत चाललीय, महागाईने सामान्य माणसांचे कंबरडे मोडलंय, रेशनची साखर बंद होवून सामान्यांना मका खाऊ घातली जातेय, गेल्या चार वर्षात भाजपने केवळ लोकांच्या भावनेशी खेळण्याचा उद्योग केलाय, शेतकरी मंत्रालयात आत्महत्या करु लागलेत, अशा स्थितीत आत्महत्या केलेल्या माणसांबद्दल तो कोण, कुठला एवढी देखील विचारपूस भाजपचे मंत्री न करता त्यांना बगल देवून जात आहेत. त्यामूळे भाजपकडे साधी माणूसकी राहिली नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरीतील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात केली.

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने काढण्यात हल्लाबोल आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिलीप वळसे-पाटील, विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले, शहराशी अनेक वर्षे जवळकीचे नाते होते. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. महापालिका निकालाच्या वेळी जनता विकासाच्या मागे गेली नाही. जनतेने आमचा पराभव केला. शहरात होत असलेले बदल, कचरा समस्या, अनेकांचा हस्तक्षेप पिंपरी-चिंचवडकरांना मान्य आहे का? आयुक्तालयाचा निर्णय झाला. पण त्याचा उपयोग नाही. इथे दहशद असून सरकार, पालकमंत्री पावले उचलताना दिसत नाहीत. शहराला कोणी वाली राहिलेले नाही. रस्त्यांच्या टेंडरची घाई केली गेली. कालवा समितीच्या बैठकीला फक्त पालिकेचे आयुक्त होते. तुमच्या पिण्याच्या पाण्यासाठी बैठकीला हे हजर राहू शकत नाही.

राज्यात जाती-जातीत भांडणे लावून दंगली घडविल्या जात आहेत. गुंडगिरी, दादागिरीने राज्यात दहशत वाढून अशांतता नादू लागली आहे. सामान्य माणसांना त्याचा त्रास होवू लागला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम सरकारचे असताना त्या भाजप अपयशी ठरले आहे. परंतू, त्याकडे दुर्लक्ष केल्याने भीमा-कोरेगावची दुदैवी घटना घडली. भीमा कोरेगावला कायदा सुव्यवस्था सरकारने राखली नाही. तिथे निष्पाप मुलाचा बळी गेला. घरे, दुकाने जाळली. त्यामागचा मास्टरमाइंड कोण, हे कळाले पाहिजे. बैलगाडा शर्यंतीबाबत खासदार, आमदार फक्त भावनांशी खेळत आहेत, अशी टिका त्यांनी केली.

देशाचे राजकारण पवारसाहेबांच्या अवती-भवती फिरत आहे. त्यांच्यासाठी आपले आमदार, खासदार वाढले पाहीजेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे घड्याळ चालले पाहिजे. शेतक-यांना सरकारने उध्वस्त केले. नीरव मोदी, ललित मोदी हजारो कोटी घेऊन गेले.  महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत बिकट अवस्था झाली आहे. उद्योगांना पोषक वातावरण नाही. भोसरीत मैदानाच्या आरक्षणात टप-या टाकून स्थानिक गुंड तेथे हप्ते गोळा करतात. शाळा काढण्याचा परवाना उद्योगपतींना दिला आहे. भारत कुठे स्वच्छ झाला ? हे सरकारने दाखवावे. सरकारमध्ये एकवाक्यता नाही. प्रशासनावर त्यांची पकड नाही. केंद्रात, राज्यात जंगलराज आले आहे.

सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैसातून सत्ता हे समिकरण सुरू आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तीकरापासून दिलासा देण्याची इच्छाशक्ती नाही. फडणवीसांना नागपूर, बापटांना पुण्याचे प्रेम आहे.  बापट काहीही बोलतात. भ्रष्टाचाराने बरबटलेले, पण आव वेगळा आणतात.  स्मार्ट सिटीचा पैसा किती आला ? पुण्यात कमळाबाई तिन नंबरला गेली. कुठं नेऊन ठेवलाय भारत, महाराष्ट्र, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी ? हा प्रश्न उपस्थित करून शिरुरची जागा आलीच पाहिजे. जेवढी ताकद द्या.  फायदा तुमचाच आहे. बेजबाबदार, नाकर्ते सरकार घालवू, असा निश्चय करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी अजितदादांनी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यावर निशाना साधत त्यांचे पिंपरी-चिंचवडकडे लक्ष नसल्याचे सांगितले… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष नागपुरकडे तर पालकमंत्री गिरीश बापट यांचे लक्ष पुण्याकडे आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला कोणी वालीच नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत ते आवाज उठवित नाहीत. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणात असलेले पीएमआरडीचे कार्यालय ते पुण्यात घेऊन गेले आहेत. त्यांचे शहराकडे संपूर्णपणे दुर्लक्ष असून त्यांना आता खासदारकीचे वेध लागले आहेत, अशीही आठवण त्यांनी जनतेला करुन दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button