breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप तोंडघशी; “बटर फ्लाय पुला”च्या भूमीपूजन कार्यक्रमाचा उडाला “फज्जा”

मंत्री, खासदार, आमदारांच्या अनुपस्थित भूमीपूजनाची नामुष्की

पिंपरी – शहराच्या वैभवात भर घालणा-या थेरगाव येथील अनोख्या “बटर फ्लाय” पुलासह बहुक्षेत्रीय इमारत आणि तालेराच्या इमारतीचे भूमीपूजन अखेर उरकण्यात आले. मात्र, भूमीपूजन कार्यक्रमात भाजपच्या पालकमंत्र्यांसह शहरातील खासदार, आमदारांनी पाठ फिरविल्याने या कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे. त्यातच आर्थिक वाटाघाटीत हिस्सेदार वाढल्याने ठेकेदारापुढे पेच निर्माण झाला आहे.

थेरगाव प्रभाग क्रमांक 18 मध्ये प्रसुनधाम शेजारी 18 मीटर डी.पी. रस्त्याच्या कामांतर्गत थेरगाव ते चिंचवड “बटर फ्लाय पूल” बांधण्यासाठी महापालिका स्थायी समितीने दि. 6 ऑक्‍टोबर 2017 रोजी ठराव मंजूर केला. संबंधित काम मे. धनेश्‍वर कंन्स्ट्रक्‍शन या संस्थेला देण्यात आले. सुमारे 29 कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. या खर्चाला स्थायी समितीने मान्यता देवून “वर्क ऑर्डर”ही काढली. संबंधित काम 18 महिन्यांत पूर्ण करण्याबाबत ठेकेदाराला मुदत दिली आहे. मात्र, सत्ताधारी पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या बगलबच्यांनी हस्तक्षेप केल्याने पुलाचे काम गेल्या सात महिन्यांपासून रखडले होते. त्यावर मार्ग काढून पुलाच्या कामाचे भूमीपूजन करण्यासाठी आज मंगळवारचा (दि. 22) मुहूर्त निश्चित केला होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने निमंत्रण पत्रिका देऊन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांना निमंत्रित केले होते. बापट यांच्यासह शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांना देखील निमंत्रित केले होते. महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेता एकनाथ पवार आणि स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्या उपस्थितीत पुलासह बहुक्षेत्रीय इमारत आणि तालेरा रुग्णालयाचे भूमीपूजन होणार होते. मात्र, मंत्री बाटप यांच्यासह खासदार बारणे, साबळे, आमदार जगताप आणि लांडगे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. काही वेळ वाट पाहिल्यानंतर मंत्री महोदय आणि स्थानिक नेत्यांच्या अनुपस्थित महापौर नितीन काळजे यांना भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. यावरून पुलाबाबत भाजपच्या नेत्यांमध्ये राजकीय अनास्था असल्याची जोरदार चर्चा केली जात आहे.

 

भाजपने घेतला श्रेयवादाचा धस्का
हा उड्डाण पूल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये येतो. या प्रभागात राष्ट्रवादीच्या अपर्णा डोके, शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे, भाजपचे सुरेश भोईर आणि राजेंद्र गावडे हे विद्यमान नगरसेवक आहेत. तीन पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे त्यांच्यात पुलाच्या कामावरून श्रेयवाद रंगला आहे. उड्डाण पुलाचे श्रेय द्यायचे कोणाला हा प्रश्न भाजपच्या नेत्यांना सलत आहे. तर, आर्थिक वाटाघाटींमध्ये हिस्सेदार वाढल्याने पुलाच्या कामात अडथळे आणले जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button