भाजपा नगरसेवकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, तरुणीला अटक

मुंबई – कल्याणमधील भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या तरुणीला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत संबंधित तरुणीने दया गायकवाड यांच्याकडून तीन लाख रुपये उकळले होते.
सप्टेंबर २०१७ मध्ये भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांच्यावर २७ वर्षांच्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. काही महिन्यांनी तरुणीने तक्रार मागे घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून संबंधित तरुणीने दया गायकवाड यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तरुणीने दया गायकवाड यांच्याकडे पैशांची मागणी केली. गायकवाड यांनी तरुणीला कार्यालयात बोलावून तीन लाख रुपये दिले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला होता. पैसे घेऊन निघण्याच्या तयारीत असतानाच खडकपाडा पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले.