भाजपला 130 जागा मिळतील…
- कर्नाटकातील विजयाबाबत अमित शहा यांचा विश्वास
बेंगळूरु – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला 130 पेक्षाही जास्त जागा मिळतील. त्यामुळे इतर कोणत्या पक्षाकडून पाठिंबा घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. बंगळुरुत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कॉंग्रेसच्या काळात कर्नाटकात कायदा अस्तित्वातच राहिला नसल्याची टीकाही त्यांनी केली.
लोकशाही तत्वांच्या विरोधात जाऊन कॉंग्रेस ही निवडणूक जिंकण्याचा आटापिटा करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेस किती खालच्या पातळीाला जाऊ शकते हे सापडलेल्या बनावट मतदार ओळखपत्रांवरुन आपण पाहिले आहे. ज्यांच्या नावांची बनावट ओळखपत्रे सापडली आहेत, त्यांना सावध राहण्याचे आवाहनही अमित शाह यांनी केले आहे.
सिद्धरमय्या यांच्यावर टीका करताना पराभवाच्या भीतीने ते दोन जागी उभे आहेत असा टोलाही अमित शाह यांनी
मारला.
निवडणूकीनंतर “सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ आणि “पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया’ची मदत भाजप घेणार नाही. कॉंग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी या पक्षांचा पाठिंबा घेऊ शकते आणि हाच भाजप आणि कॉंग्रेसमधील फरक आहे. कॉंग्रेस देशद्रोहींचा पाठिंबा घेताना मागे पुढे पहात नाही, असा आरोपही शहा यांनी केला.