Mahaenews

भाजपने कामगारांना देशोधडीला लावले – इरफान सय्यद

Share On

कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे विविध कार्यक्रम

पिंपरी – भाजप सरकार मालकधार्जिणे आहे. काबाडकष्ट, अंगमेहनतीने काम करणा-या असंघटित माथाडी हमाल कामगारांना योग्य न्याय मिळावा. त्यांचे जीवन सुखकर व्हावे याकरिता माथाडींचे दैवत अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष करुन या घटकाला स्थैर्य मिळवून दिले. त्यांना सन्मानाने जगायला शिकविले. माथाडी कामगारांसाठी कायदा केला. परंतु, भाजप सरकार माथाडी कायदा रद्द करण्याचा कुटिल डाव रचत आहे.  कायदे मोडून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भांडवलशाही सरकारला माथाडी कामगार त्यांची जागा दाखवून देतील, असे मत महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक व कामगार नेते इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.

जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे गुरुवारी (दि.3) निगडी, वाहतूकनगरी येथील सभागृहात कामगार मेळावा माथाडी कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहर संघटिका सुलभा उबाळे, भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक व कामगार नेते इरफान सय्यद, असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणेचे अध्यक्ष अमित धुमाळ आदी उपस्थित होते.

कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले, ”आण्णासाहेब पाटील यांनी कामगार हिताचे केलेले कायदे भाजप सरकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे मालकप्रेमी सरकार 36 माथाडी बोर्ड बंद करायला निघाले होते. परंतु, भाजप सरकारचा हा डाव कामगारांच्या एकजुटीने हाणून पाडला आहे.  या भांडवलशाही सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. त्यासाठी सर्व कामगारांनी एकत्र राहण्याचे आवाहन त्यांनी केले”  कार्यक्रमाचे सूत्रंसचालन सर्जेराव कचरे यांनी केले. तर, योगेश जाधव यांनी आभार मानले. संयोजनात सचिन मोरे, साई धोत्रे, अनिल खपके, चंदन वाघमारे यांनी संयोजनात पुढाकार घेतला.

Exit mobile version