भाजपच्या बचत धोरणाचा गोरगरीब विद्यार्थ्यांना बसणार फटका

शालेय साहित्य खरेदीत अनेक तरतुदी शून्य : शिक्षण मंडळाचे अतिआयुक्तांकडे गाऱ्हाणे
विकास शिंदे
पिंपरी – भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सुचनेनुसार सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी महापालिकेत बचतीचे धोरण राबविले आहे. त्या बचत धोरणाचा फटका यंदा महापालिका शाळांमधील गोरगरीब विद्यार्थ्यांना बसण्याची दाट शक्यता आहे. कारण, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शालेय साहित्य पुरविले जाते. परंतू, चालू आर्थिक वर्षांत शिक्षण मंडळाच्या अनेक लेखार्शिषकात शुन्य तरतुद केल्याने शालेय साहित्यापासून हजारो विद्यार्थी वंचित राहणार आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षांतील सर्वच शाळा 15 जून पासून सुरु होत आहेत. तरीही महापालिका शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्पात अनेक साहित्य खरेदीच्या तरतुदी शुन्य असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी भाजपने बचतीचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे काही शालेय साहित्य खरेदीचे लेखार्शिषकात अजूनही निधी वर्ग केल्याचे दिसत नाही. यामुळे शालेय साहित्य खरेदीला अडथळा निर्माण होणार आहे. महापालिका शाळांमधील सुमारे 43 हजार गोरगरीब विद्यार्थ्यांना सत्ताधा-यांच्या बचतीचा फटका बसून यंदाही शाळेच्या शैक्षणिक साहित्य वाटपास मुकावे लागणार आहे.
महापालिका शिक्षण मंडळ 2 जून रोजी बरखास्त झाले आहे. त्यानंतर महापालिकेत शिक्षण समिती निर्माण करण्यात आली. मात्र, सत्ताधारी भाजपच्या गोंधळामुळे शिक्षण समिती वर्षभरात अस्तित्वात आलेली नाही.सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीला यंदाही विलंब होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेने यंदाही मागील ठेकेदारांना मुदतवाढ देवून शैक्षणिक साहित्य खरेदीला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. परंतु, शिक्षण मंडळाच्या बजेट मध्ये अनेक लेखार्शिषकांना शून्य तरतुद असल्याने काही साहित्यांची खरेदीची प्रक्रिया थांबली आहे.
दरम्यान, महापालिका शिक्षण मंडळाकडून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पी.टी.गणवेश, शालेय बुट, सॅाक्स, शालेय दप्तर, रेनकोट, पावसाळी साधने, शालेय वह्या, स्वेटर, पी.टी.शूज, अभ्यासपुरक पुस्तके, फुटपट्टी, कंपासपट्टी आदी साहित्य पुरविले जाते. परंतू, यंदाच्या अंदाजपत्रकात पावसाळी साधने खरेदीत विद्यार्थ्यांचे पी.टी.शूज, दप्तर, रेनकोट यासह काही साहित्याला तरतूद न केल्यामुळे विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे.