भाजपच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी कपातीचा पिंपरी-चिंचवडकरांना फटका

- सामाजिक कार्येकर्ते मारुती भापकर यांचा आरोप
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपच्या ढिसाळ नियोजनामुळेच शहरावर दिवसाआड पाणी कपातीची वेळ आली आहे. केवळ कागदी घोडे नाचवून ढिसाळ नियोजनामुळे पिंपरी चिंचवडकरांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. असा आरोप सामाजिक कार्येकर्ते मारुती भापकर यांनी केला.
याबाबत महापाैर राहूल जाधव यांना दिलेल्या प्रसिध्दपत्रकांत म्हटले आहे की, आपण व सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन फेब्रुवारी २०१९ च्या सुरुवातीला शहरात कुठल्याही प्रकारची पाणी कपात केली जाणार नाही. असे जाहीर केले होते. तसेच मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी स्वत: पुढाकार घेऊन पवना धरणातील सन २०१६ मध्ये धरणातून लोकसहभागातू ३५ हजार क्यूबिक मीटर गाळ काढला. दुस-या सन २०१७ मध्ये पवना धरणातून ४९ हजार क्यूबिक मीटर गाळ काढला. सन २०१८ मध्ये ४३ हजार क्यूबिक मीटर गाळ काढला. असा दावा त्यांनी केला होता. शिवसेना पदाधिका-यांनी दिड लाख ट्रक गाळ खासदारांनी काढला. त्यामुळे धरणात दिड टि.एम.सी. पाणीसाठा वाढला. असा प्रसार व प्रचार सन २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत जोरात केला. तर मग यावर्षी दिवसाआड पाणी कपातीची वेळ महापालिका प्रशासनाला का आली ?
लोकसभा निवडणूक २०१९ महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये पार पडली. मावळ व शिरुर लोकसभेचे मतदान २९ एप्रिल २०१९ ला झाले. त्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व महापालिका प्रशासनाने पिंपरी चिंचवड शहरात सोमवार दि.०६ मे २०१९ पासून दिवसाआड पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार पाणी पुरवठा झाल्यास मंगळवार, गुरुवार व शनिवार पाणीपुरवठा बंद राहील. असे जाहीर केले आहे. सन २०१४ पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन बनविण्याचे काम केले. पाणी कपातीचा हा निर्णय देखील मतांचे राजकारण करुन सत्ता राखण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा भाजपाने खोटे आश्वासने देऊन जनतेची मते घेऊन फसवणूकच केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात दररोज ४० टक्के पाणी गळती व पाणी चोरी होते. मागील वर्षी यावर मा. महापालिका सभेत वादळी चर्चा झाली होती. त्यावर सर्व पक्षीय पदाधिकारी नगरसेवक घसा कोरडा होईपर्यंत बोलले होते. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या सगळ्या सदस्यासमोर तात्रिंक अत्यंत अभ्यास पुर्ण माहीती देत अनेक घोषणा केल्या होत्या. मात्र ते सर्व म्हणजे कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार म्हणावा लागेल.
पवना बंद जलवाहिनी, आंध्रा व भामा-आसखेड धरण पाणी योजनेवर सत्ताधारी भाजपाला गेल्या ५ वर्षात काहीही करता आलेले नाही. २४ तास पाणी पुरवठा योजना कागदावरच राहीली. त्यामुळेच पाणी नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. प्रशासन व सत्ताधारी भाजपामध्ये ताळमेळ नसल्याने आणि ढिसाळ नियोजनामुळेच शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी कपातीला सामोरी जावे लागत आहे.
पवना धरणात २९ टक्के साठा राहीला आहे. हा साठा ३० जूनपर्यंत पुरेसा ठरणार आहे. पावसाळा लांबणीवर पडणार आहे याचा अंदाज घेऊन ही पाणी कपात करण्यात येत आहे. त्यातून २५ टक्के पाणी बचत होऊन धरणातील पाणीसाठा १५ जूलैपर्यंत पुरेल, त्यामुळे या पाणी कपातीला विरोध नाही. मात्र राजकीय हेतूने प्रेरीत होऊन खोटे बोलून लोकांची दिशाभूल करणे, प्रशासन व सत्ताधा-यांमध्ये ताळमेळ नसणे, केवळ कागदी घोडे नाचवून ढिसाळ नियोजन यामुळेच शहरवासींयांना हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. तरी वरील सर्व सुचनांबाबत योग्य त्या उपाययोजना करुन वेळेचे नियोजन करुन आपण व प्रशासनाने काम करावे. म्हणजे पुढच्या वर्षी तरी शहराला दिवसाआड पाणी कपातील सामोरी जावे लागणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन व उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.