भयंकर… तिच्या एक्स बॉयफ्रेण्डने घेतला ओठांचा चावा, घालावे लागले ३०० टाके

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना राज्यात एक विचित्र प्रकार घडला आहे. येथील एका तरुणाने रागाच्या भरात आपल्या एक्स गर्लफ्रेण्डच्या ओठांचा कडकडून चावा घेतला. ‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार कायला आणि तिचा प्रियकर सेट एरॉन हे २०१६ पासून रिलेशनशिपमध्ये होते. कायला १७ वर्षांची असताना आणि एरॉन २१ वर्षांचा असताना सुरु झालेलं हे नातं एका वर्षाने म्हणजे २०१७ साली अचानक संपुष्टात आले. एरॉन दिवसोंदिवस आपल्यावर जबरदस्ती करुन मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत असल्याने तिने ब्रेकअप केल्याचे सांगितले.
काही दिवसांनंतर एरॉनने कायलाला फोन करुन मला नौदलात नोकरी लागली असून तिकडे रवाना होण्याआधी एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. कायला आणि एरॉन यांची भेट झाली तेव्हा त्यावेळी एरॉनने पुन्हा एकदा नाव्याने नात्याला सुरुवात करण्यासंदर्भात तिच्याकडे विचारणा केली. मात्र तिने याला नकार दिल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद घालता घालता एरॉनने कायलाच्या ओठांचे चुंबन घेतले. मात्र संतापलेल्या कायलाने त्याला दूर ढकलेले. पण एरॉनने दातांनी ओठ इतक्या घट्ट पकडले होते की त्याने तिच्या ओठांचा लचकाच तोडला. त्यानंतर एरॉनने केसांना धरुन मला ओढले आणि बाजूला नेले मात्र मी आरडाओरड केल्यानंतर त्याने तिथून पळ काढल्याचे कायलाने ‘द सन’शी बोलताना सांगितले.
कायलाच्या ओठांवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. कायलाच्या चेहऱ्यावर चक्क ३०० टाके घालावे लागले. एरॉनने घेतलेला चावा इतका भयंकर होता की त्यामुळे कायलाच्या ओठांवर कायमचा परिणाम झाला असून आता तिला आयुष्यभर ओठांची मोजकीच हलचाल करता येणार आहे. या प्रकरणी एरॉनला अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांना कायलाच्या गालापासून शस्त्रक्रिया करुन फाटलेले ओठ शिवावे लागल्याची माहिती कायलाने दिली. ‘माझ्या शरीरावर त्याला कायमचे व्रण सोडायचे होते म्हणून त्याने हे कृत्य केले,’ असं कायला म्हणते.
या प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले असून १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या कायलाने पुन्हा शिक्षण सुरु केले असून आता ती घरगुती हिंसेसंदर्भात जनजागृती करत आहे.