भंडारा-गोंदियातील विजय माझ्यामुळेच – नाना पटोले

नागपूर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करून त्यांचा विषय तेथेच संपवला आणि या पोटनिवडणुकीत भाजपला ताकद दाखवून दिली. आता पुढे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे माझे लक्ष्य आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी ४८ हजारांहून अधिक मताधिक्क्याने भाजपच्या उमेदवाराला हरवले. नाना पटोले यांनी २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली होती. नंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेतकरी आणि ओबीसींच्या मुद्दय़ांवरून टीका केली आणि खासदारकीचा राजीनामा दिला. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय (गवई), पीरिपाची आघाडी होती. येथे राष्ट्रवादीचे कुकडे यांचा विजय झाला.