breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
‘बैलगाडा शर्यत’ विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी!

– आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा
– राज्यातील बैलगाडा मालकांत आनंदोत्सव
पिंपरी- तामीळनाडू येथील जलीकट्टू स्पर्धेच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने पाठवलेल्या विधेयकावर मावळते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी झाली आहे. त्यानंतर हे विधेयक गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आले. त्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
राज्य सरकारने बैलगाडा शर्यती सुरु करण्याबाबत ऐतिहासिक विधेयकला विधीमंडळ अधिवेशनात मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला होता. केंद्रीय गृहखात्याच्या सहमतीने आणि कायदेशीर बाजुंची तपासणी करुन सदर विधेयक स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी (दि.२२ जुलै) देशाचे मावळते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर विधेयक केंद्र सरकारच्या गृहखात्याकडे पाठविण्यात आले आहे. केंद्र सरकारचा गृहविभाग संबंधित विधेयक महाराष्ट्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठविणार आहे. त्यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून संबंधित विधेयक वन मंत्रालय, पशु संवर्धन आणि सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने बैलगाडा शर्यतीसंदर्भात घोषणा करणार आहे. या प्रक्रियेला सुमारे दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या सकारात्मक पाठपुराव्यामुळेच बैलगाडा शर्यतींचा प्रश्न मार्गी लागला, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेनेच अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर यांनी दिली.
—————–
राज्यातील बैलगाडाप्रमींचे यश- आमदार लांडगे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी सुरूवातीपासून सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्यातील तमाम बैलगाडा मालकांच्या एकजुटीमुळेच हा प्रश्न आम्ही मार्गी लावू शकलो. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात जिल्हाधिका-यांच्या पूर्वमान्यतेने बैलगाडा शर्यत घेण्यात येतील. शर्यतीसाठी वापरण्यात येणा-या प्राण्यांना कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारणी इजा केली जाणार नाही. कलम ३८ ख खालील नियमांना अधीन राहून शर्यत आयोजित करता येईल. त्याचे उल्लंघन करणा-या व्यक्तीला पाच लाख रुपये दंड अथवा तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होईल, अशा प्रकारचे विधेयक मंजुर करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली बैलगाडा शर्यत लवकरच पुन्हा सुरू होणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.