बेइमानी म्हणजे काय हो साहेब?- उद्धव ठाकरे

मुंबई : भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. याच मुद्यावरुन आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर कडाडून टीका करण्यात आली आहे. चिंतामण वनगा आयुष्यभर आदिवासी पाड्यांवर भगवा ध्वज हाती घेऊन काम करीत राहिले. मात्र त्यांची मरणोत्तर उपेक्षा करणे आणि राजेंद्र गावीत यांच्यासारखे दलबदलू लोक आयात करून हेच वनगांचे राजकीय वारसदार बरं का, असे आता जाहीर सभांतून सांगणे यालाच बेइमानी म्हणतात साहेब. मुख्यमंत्री पैशांचा पाऊस पाडत आहेत, पण सत्य व प्रामाणिकपणाचा म्हणजे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचाच विजय होईल. कर्नाटकात आमदारांना विकत घेऊन राज्य आणू पाहणाऱ्या रामलूंसारख्या धनदांडग्यांचे काही चालले नाही. महाराष्ट्र तर शिवरायांची पवित्र भूमी आहे. पालघरला असे बेइमान, भ्रष्ट रामलू पाचोळय़ासारखे उडून जातील. बेइमानीचा पराभव सुरू झालाय, साहेब”, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे भाजपकडून कोणी फिरकले नाही. मुख्यमंत्री सोडाच, पण जिल्हयातील संघ आणि भाजप परिवाराने पाठ फिरवली. वनगा यांचे निधन दिल्लीत झाले. त्यांच्या निवासस्थानापासून ‘भाजप’चे कार्यालय पाच मिनिटांवर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाईंचे घर तीन मिनिटांवर. इतरही भाजप परिवार आसपास असतो. कोणी त्यांच्या पार्थिवावर फूल वाहण्यास गेले नाही. वनगा यांनी सारी हयात ठाणे – पालघरच्या आदिवासी भागात संघाचा विचार व भाजप वाढविण्यात घालवली. त्यासाठी त्यांना शारीरिक हल्ले सहन करावे लागले.
वनगा हे मरेपर्यंत भाजपशी इमान राखूनच होते. त्यांच्या इमानदारीची किंमत मरणानंतर संपली व वनगा यांच्या कुटुंबाला जणू वाऱ्यावरच सोडण्यात आले. वनगा यांनी हयात भारतीय जनता पक्षात घालवूनही मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांचे धिंडवडे निघाले. कुटुंबाचे पालकत्व घ्यायला भाजपचा एकही मायका लाल पुढे आला नाही. तेव्हा ‘बेइमानी’ म्हणायचीच असेल तर ती ‘बेइमानी’ आहे असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.