बेंगळुरूला प्ले-ऑफचे दार बंद; विराट कोहलीने हात टेकले!

पुणे: रायजिंग पुणे सुपरजाएंट्सच्या गोलंदाजांपुढेही आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू संघाला ‘प्ले ऑफ’चे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.
बेंगळुरू संघाच्या खात्यात १० सामने खेळल्यानंतर अवघे पाच गुण असून उरलेले चारही सामने जिंकले तरी त्यांची गुणसंख्या १३ पर्यंतच जाणार आहे. अंतिम चार संघात स्थान मिळवण्यासाठी हे गुण पुरेसे ठरतील अशी शक्यता फारच कमी असून विराटनेही पराभवानंतर त्याची कबुली दिली आहे. बाद फेरीत जाण्याच्या आमच्या आशा जवळपास मावळल्या आहेत तरीही उरलेल्या सर्व सामन्यांत सर्वश्रेष्ठ खेळ करण्यावर आमचा भर असेल, असे विराट म्हणाला.
विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम पुणे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. पुण्याचा संघ निर्धारित षटकांत १५७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने ४५, मनोज तिवारीने ४४, राहुल त्रिपाठीने ३७ तर महेंद्रसिंग धोनीने नाबाद २१ धावांचे योगदान दिले. बेंगळुरू संघाला १५८ धावांचं माफक लक्ष्य गाठायचं होतं. मात्र विराटच्या संघातील ‘शेर’ अवघ्या ९६ धावांपर्यंतच मजल मारू शकले.