बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दुसऱ्या दिवशीही खोळंबा

नवी दिल्ली- बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी देशभरातील बॅंक व्यवहार विस्कळीत झाले होते. बॅंकांमधील ठेवी, मुदत ठेवींचे नुतनीकरण, सरकारी कोषागार आणि वित्तीय बाजारातील व्यवहारांवर आज परिणाम झाला. देशातील काही भागांमधील एटीएममधील रोख रक्कम संपल्यानेही नागरिकांची तारांबळ झाली. बॅंक कर्मचाऱ्यांचा संप संपल्याने आज बॅंकांचे व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता आहे.
संपामुळे देशभरातल्या विविध सरकारी, जून्या खासगी, विदेशी आणि प्रादेशिक ग्रामीण बॅंकांमधील सुमारे 80 लाख धनादेश पडून राहिले आहेत, असे “युनायटेड फोरम ऑफ बॅंकिंग युनियन्स’ या संघटनांच्या महासंघाने म्हटले आहे. “युएफबीयु’ ही बॅंक कर्मचाऱ्यांच्या 9 संघटनांची मातृसंघटना आहे. दोन दिवसांचा हा संप पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा “युएफबीयु’ने केला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळूरु, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, नागपूर, जम्मू, गोवाहाटी, जमशेतपूर, लखनौ, आग्रा, अंबाला आणि त्रिवेंद्रममधील सर्व बॅंकांच्या सर्व शाखांमधील सुमारे 10 लाख बॅंक कर्मचारी या संपामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.