बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बॅंक सेवा विस्कळीत

नवी दिल्ली – सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे देशभरातील बॅंक सेवेवर आज परिणाम झाला. सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये “इंडियन बॅंक असोसिएशन’कडून केवळ 2 टक्के पगारवाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ देशभरातील तब्बल 10 लाख बॅंक कर्मचाऱ्यांनी हा 2 दिवसांचा संप पुकारला आहे.
या संपाला काही जुन्या खासगी क्षेत्रातील बॅंका आणि विदेशी बॅंकांमधील कर्मचारी संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. हा संप उद्याही सुरु राहणार आहे. या संपामध्ये देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील 21, खासगी क्षेत्रातील 13 जुन्या बॅंका, 6 विदेशी बॅंका आणि 56 प्रादेशिक ग्रामीण बॅंकांमधील 10 लाख कर्मचारी संपावर गेले होते.
आयसीआयसीआय, एचडीएफसी, ऍक्सिस आदी बॅंकांमधील व्यवहारांवर या संपाचा परिणाम झाला नाही. मात्र धनादेश वटवण्यासारख्या काही कामकाजाचा खोळंबा झाला. केरळ, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडसारख्या काही राज्यांमध्ये संपाचा परिणाम अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक गंभीर होता.