बिहारी कुणावर ओझे बनून राहत नाहीत: नीतीश कुमार

मुंबई: ‘बिहारी माणसे कोणावरही ओझे बनून राहणारे लोक नाहीत, तर ही माणसे लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारी आहेत’, अशा शब्दात बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मुंबईतील बिहारी लोकांचा गौरव केला आहे. नीतीश कुमार यांचे हे वक्तव्य म्हणजे बिहारी आणि उत्तर भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या शिवसेना आणि मनसेसारख्या पक्षांवर हल्ला असल्याचे मानले जात आहे.
मुंबईत मैथिली समन्वय समितीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी बिहारी तसेच उत्तर भारतीयांचा त्यांच्या कामगिरीबाबत गौरव केला.
नीतीश कुमार यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, बिहारचा माणून जेथे कोठे जातो, तेथे तो कधीही ओझे बनून राहत नाही. तो लोकांना रोजगार देतो, कुणावर अवलंबून असत नाही.
विशेष म्हणजे नीतीश कुमार यांचा पक्ष ‘जेडीयू’ महाराष्ट्रातील राजकारणात आपले स्थान शोधण्याचा प्रयत्न करत असताना नीतीश कुमार यांनी हे वक्तव्य केले आहे. नीतीश कुमार यांचे लक्ष मुंबईत राहणाऱ्या बिहार आणि उत्तर प्रदेशमधील लोकांवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आज केलेले वक्तव्य याच समीकरणाशी जोडले जात आहे. नीतीश कुमार यांनी येथे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही संबोधित केले.