बिहारमध्ये दारू पिणाऱ्यास 50,000 रुपये दंड वा तीन महिने कैद

पाटणा (बिहार) – बिहारमधील दारूबंदी आता अधिक कडक होणार आहे. आता दारू बनविणारांप्रमाणे आणि विक्री करणारांप्रमाणे दारू पिणाऱ्यासही कडक शासन होणार आहे. दारू पिणाऱ्यास पहिल्या अपराधाबद्दल रु. 50,000/- दंड वा 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. आणि दुसऱ्या अपराधाच्या वेळी किमान एक वर्ष तुरुंगवास होणार आहे. दारूची, निर्मिती, वाहतूक वा विक्रीसाठी पहिल्या अपराधास पाच वर्षे तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड आणि दुसऱ्या अपराधाबद्दल किमान 10 वर्षे तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.
बिहार दारूबंदी आणि उत्पादन कायदा 2016 च्या 2ऱ्या कलमात दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्ती नुसार ज्या ठिकाणी दारू जप्त केली असेल ती जागा जप्त करता येणार आहे. पूर्वी यामध्ये जमीन, घर, हॉटेल, बार, बूथ यांचा समावेश होता. मात्र आता यामध्ये बोट, मोटरगाडी वा अन्य कोणत्याही वाहनाचाही समावेश करण्यात आलेला आहे.
कायद्यातील कलम 32 मध्येही दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्तीनुसार संबंधित जागा वा वाहनाच्या मालकालाही स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तसे न दिल्यास त्यालाही अपराधी मानले जाणार आहे.