बिग बॉसच्या घरात फुल्ली-गोळा खेळून सई झाली कॅप्टन !

बिग बॉसच्या घरात त्यागराज खाडिलकर व सई लोकरू यांच्यात कॅप्टनसीची चुरस रंगली. फुल्ली-गोळा खेळत तीन फुल्ल्या किंवा तीन गोळे एका रेषेत करून कॅप्टनसीच्या उमेदवारांनी कॅप्टनपद जिंकायचे होते. पण या खेळातील फुल्ल्या व गोळे हे सदस्यच होते. त्यामुळे सई व त्यागराज यांना घरातील इतर सदस्यांनाकडून समर्थन मिळवायचे होते. सईचे समर्थक हे या खेळातील फुल्ल्या होते तर त्यागराजचे समर्थक गोळे होते.
कॅप्टनसीच्या या टास्कमध्ये सईने बाजी मारली. कॅप्टनपदासाठी ती कशी व किती योग्य आहे, हे पटवून देत तिने रेशम व आस्तादलाही आपल्याबाजूने वळवले. ‘प्रत्येक ठिकाणी मला सांभाळून घेण्यासाठी माझे आई-वडील माझ्यासोबत नसतील. त्यामुळे जगाशी कसं वागायचं हे मला कळलं पाहिजे,’ असे सईने म्हटले; तर सईला हा साक्षात्कार चक्क दीड महिन्याने झाला हे पाहून रेशमला आश्चर्य वाटले. परंतु सईला एक संधी द्यावी असे वाटल्याने रेशम व आस्तादने मिळून तिला समर्थन द्यायचे ठरवले.
शर्मिष्ठा व पुष्कर यांनी त्यागराज कोणाबद्दल काय बोलतात हे सांगून त्याचे पितळ उघडे पाडले. तसेच घरात भांडणाचा प्रसंग उद्भवला तर त्यागराजला घरातील परिस्थिती सांभाळता येणार नाही असे मत आस्तादने मांडले. आस्ताद उठून बाजूला गेला व त्याची जागा आऊंनी घेतली. आऊ, पुष्कर व शर्मिष्ठा अशा तीन फुल्ल्या एका रेषेत आणून सई विजय ठरली.