बिग बॉसच्या घरातून हर्षदा खानविलकरची ‘एक्झिट’

मागच्या आठड्यात बिग बॉसच्या घरात दाखल झालेली अभिनेत्री हर्षदा खानविलकर हिनं बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. ‘मर्डर मिस्ट्री’ टास्क संपल्यानंतर घरातील सर्व सदस्य गार्डन एरियामध्ये बसले असताना बिग बॉसने केलेल्या एका घोषणेमुळं सर्वांनाच धक्का बसला. बिग बॉसनं घरातील सदस्यांना ‘अतिथि देवो भव’चा अर्थ समजावून सांगितला.
आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना कधीना कधी निरोप द्यावा लागतो. त्यामुळं घरात आलेल्या अतिथीला आता निरोप द्यायची वेळ आली असल्याचं बिग बॉसनं म्हटलं. हर्षदा खानविलकर या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून नाही, तर एका आठवड्यासाठी पाहुणी म्हणून आली होती अन् तिला निरोप द्यायची वेळ आल्याचे बिग बॉसने सांगितले. हर्षदाचा निरोप घेताना जुई, रेशम आणि सुशांत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. निरोप घेण्याआधी हर्षदानं तिचा बिग बॉसच्या घरातील अनुभव शेअर करत घरातली सदस्यांबद्दल मतं व्यक्त केली. हा शो सर्वांनीच जिंकावा असं वाटत असलं तरी, रेशमनं हा शो जिंकावा अशी माझी मनापासून इच्छा असल्याचंही हर्षदा म्हणाली.