मनोरंजन

‘बाहुबली-३’बद्दल राजामौलींचं सूचक विधान!

नवी दिल्ली: ‘बाहुबली२: द कन्क्लूजन’ संपताना आपल्याला एक संवाद ऐकू येतो. ‘दादाजी, क्या महेंद्र बाहुबली का बेटा महिष्मती का अगला राजा होगा?’, असा प्रश्न एक छोटा मुलगा विचारतो. त्यावर, ‘कौन जाने बेटा शिवा के मन में क्या है?’ असं उत्तर दादाजी त्याला देतात. ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ‘बाहुबली-३’चीच ही पहिली घंटा नाही ना, अशी शंका त्यांना आली होती. आता, दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या विधानानं ती बळावली आहे.
‘बाहुबली-३’चा विचार मी करतोय, ही तुमची माहिती योग्यच आहे. माझ्या वडिलांनी (के व्ही विजेंद्र प्रसाद, ‘बाहुबली’चे लेखक) एखादी दमदार कथा लिहिली, तर मी त्यावर सिनेमा करण्यासाठी केव्हाही तयार आहे, असा मानस एस एस राजामौली यांनी व्हरायटी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. प्रेक्षकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. अशावेळी सशक्त कथानक नसताना सिनेमा बनवणं योग्य नाही. पण ‘बाहुबली’ची पुढची गोष्ट वडिलांना सुचली, त्यांनी लिहिली तर बाहुबली-३ होऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘बाहुबलीः द बिगीनिंग’च्या तुफान यशानंतर ‘बाहुबली२: द कन्क्लूजन’नं सगळे विक्रम मोडीत काढलेत. अवघ्या सहा दिवसांत या सिनेमानं ७९२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं?’, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी या सिनेमावर उड्या पडल्या आणि प्रेक्षक बाहुबलीचा पराक्रम पाहून पुन्हा भारावून गेले. स्वाभाविकच, बाहुबली-३ ची चर्चा सुरू झाली आहे. तिला खुद्द राजामौली यांनीही हवा दिलीय. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे.  दरम्यान, बाहुबलीची ‘लार्जर दॅन लाइफ’ भूमिका ताकदीनं साकारणारा प्रभास आता ‘साहो’ या सिनेमात दिसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button