बालाकोट कारवाईत पाकिस्तानी नागरिक मारले न जाण्याची दक्षता घेतली – स्वराज

अहमदाबाद : फेब्रुवारीत बालाकोट येथे दहशतवादी छावणीवरील हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारला गेलेला नाही, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.
भाजप महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्वराज यांनी सांगितले, की पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने लष्कराला दहशतवाद्यांवर कारवाईसाठी मोकळीक दिली होती. त्यातून लष्कराने बालाकोट येथे हल्ला केला. त्यात एकही पाकिस्तानी नागरिक व सैनिक ठार झालेला नाही. पाकिस्तानी लष्करावर ओरखडाही उमटलेला नाही. आम्ही लष्कराला स्वसंरक्षणार्थ कारवाईसाठी मोकळीक दिली पण पाकिस्तानी नागरिक व जवान ठार मारले जाणार नाहीत, याची काळजी घेण्यास सांगितले होते.
त्या पुढे म्हणाल्या की, पुलवामात चाळीस जवानांचा बळी घेणाऱ्या जैशच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यास आम्ही मुभा दिली होती. त्यातूनच लष्कराने बालाकोट येथे जैशचा तळ उद्ध्वस्त केला. भारताने स्वसंरक्षणार्थ हवाई हल्ले केले. तशी कल्पना आंतरराष्ट्रीय समुदायास देण्यात आली होती. सगळा आंतरराष्ट्रीय समुदाय भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांत पाठीशी होता
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना त्या म्हणाल्या, मोदी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील उच्च नेते असून त्यांनी जागतिक पातळीवरील मुद्दय़ांचा अग्रक्रम ठरवण्यास भाग पाडले आहे.