बाणेरमधून ३५ लाखांचा दिडशे किलो गांजा जप्त; दोघे अटकेत

बाणेर येथे दोन जणांना अटक करुन त्यांच्याकडून तब्बल ३५ लाख ८८ हजार रुपये किमतीचा दीडशे किलो गांजा अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे.
योगेश दत्तात्रय जोध (वय २८) आणि सागर दिगंबर कदम (वय २८, दोघेही रा. डी.मार्ट जवळ, जुळे सोलापूर, जि. सोलापूर) असे गांजासह अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पोलीस हवालदार राजन महाडीक यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि काहीजण बाणेर येथे गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत. यावर अमली पदार्थ विरोधी पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून योगेश आणि सागर या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्या जवळील सामानाची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल ३५ लाख ८८ हजार रुपये किमतीचा दीडशे किलो गांजा आढळुन आला. पोलिसांनी तो जप्त करुन योगेश आणि सागर या दोघांना अटक केली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस कर्मचारी प्रशांत महाले, कर्मचारी राजन महाडीक, राजेंद्र बांबळे, प्रदीप शेलार, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, दादा धस, प्रसाद जंगीलवाड, अशोक गारगोटे, शैलेश मगर, प्रदीप गट्टे, अनिता यादव यांच्या पथकाने केली.