breaking-newsपुणे
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचे ससूनमधून पलायन

कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने ससून रुग्णालयातून पलायन केले. हा प्रकार रविवारी घडला. मानसिक आजार झाल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अक्षय अशोक लोणारे (वय-21, रा.येरवडा कारागृह), असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक एस.एम.निकम यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीवर 2015 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात होता. त्याच्यावर असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याची सुनावणी सुरू होऊन साक्षी, पुरावे तपासून तो अंतिम टप्प्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अक्षयला मानसिक आजार असून उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात भरती केले होते. शनिवारी आणि रविवारी पोलीस नाईक निकम आणि शिपाई पांचाळ, कुंभार आणि खेंदाड हे चार पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते. दरम्यान, रविवारी सकाळच्या सुमारास खेंदाड आणि निकम हे चहा पिण्यासाठी गेले होते आणि कुंभार लघुशंकेसाठी गेले होते. या दरम्यान अक्षयने पांचाळ यांची नजर चुकवून पळ काढला.