बलात्काराच्या आरोपांवरून हॉलीवूड निर्माता हार्वे विस्टीनला अटक

न्यूयॉर्क (अमेरिका) – प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे विस्टीनला न्यूयॉर्क पोलीसांनी आज बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांवरून अटक केली. 80 पेक्षा अधिक महिलांनी त्याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतर अनेक महिन्यांनी त्याला अटक करण्यात आली आहे. हार्वे विस्टीनच्या विरोधात तक्रारी यायला सुरुवात झाल्यानंतर जगभरात “मी टू’ चळवळ जोरात चालू झाली.
हॉलीवूड्मधील एक अत्यंत नामवंत निर्माता आज लोअर मॅनहॅटनमधील पोलीस स्टेशनवर पोलीसांच्या स्वाधीन झाला. त्याच्याभोवती असंख्य डिटेक्टिव्ह आणि पोलीसांचा गराडा पडलेला होता. पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात आली. एका आरोपपत्रात त्याच्यवर फर्स्ट डिग्री रेप, थर्ड डिग्री रेपचा आणि दुसऱ्या आरोपपत्रात फर्स्ट डिग्री क्रिमिनल सेक्स चा आरोप ठेवण्यात आलेला आहे. नंतर त्याला जामिनवर मुक्त करण्यात आले. जामीनासाठी त्याने दहा लाख डॉलर्स रोख जमा केले असून मॉनिटरिंग डिव्हाईस वापरायचे मान्य केले आहे. यामुळे तो कोठे आहे याचा सतत पाठपुरावा करता येणार आहे. त्याच्या जामिनाबाबत अगोदरच बोलणी करण्यात आलेली होती असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याला आपला पासपोर्ट जमा करावा लागणार असून त्याच्या हालचालींवर बंधने घालण्यात आलेली आहेत.
गायवेन्थ पॅल्ट्रो, अँजेलिना जोली, सलमा हायेक, ऍशली जुड, उमा ट्रूमन आणि ऍशिया आर्गेनसह अनेक नामवंत चित्रपट तारकांनी हार्वे विस्टीनवर लैंगिक अत्याचार, बलत्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत. एकेकाळी हॉलीवूडमधील् अत्यंत नामवंत असणऱ्या हार्वे विस्टीनची मोठया झपाट्याने अधोगती झाली आहे.
हार्वे विस्टीनची प्रकरणे उघड करणाऱ्या फ़ॅरो या पत्रकाराला पुलित्झर ऍवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.
हार्वे विस्टीनल प्रकरणानंतर जगभरात सर्वत्रच महिलांनी आपल्यावरील अत्याचारांना “मी टू’ म्हणत वाचा फोडण्यास सुरुवात केली.