breaking-newsपुणेमहाराष्ट्र

बढती मिळूनही “भत्ता’ घेण्याची “घाण’

 

  • वरिष्ठ अधिकारी बदलूनही अनेक वर्षांपासून प्रकार सुरू
    – 600 कर्मचाऱ्यांचा समावेश : आरटीआमधून भांडाफोड

पुणे – महापालिकेच्या झाडण, ड्रेनेज, कचरा इत्यादी कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घाण भत्ता दिला जातो. मात्र या विभागातून बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा घाण भत्ता बंद होणे आवश्‍यक असताना अजूनही काही कर्मचारी घाण भत्ता घेत असल्याचे उघडकीला आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून वरिष्ठ अधिकारी बदलूनही हा प्रकार थांबला नसल्याची धक्कादायक गोष्टही त्यातून पुढे आली आहे.

महापालिकेच्या हद्दीमध्ये झाडण, ड्रेनेज सफाई आणि कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनासोबत घाण भत्ता दिला जातो. या विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली दुसऱ्या विभागात झाली, किंवा त्याला बढती मिळून तो अन्य विभागात काम करत असल्यास नियमाप्रमाणे त्याचा घाण भत्ता बंद होणे आवश्‍यक आहे. मात्र स्वच्छ विभागातून टेंडरसेल, स्थापत्य विभाग, ग.व.नि. विभागात आणि जेईच्या हाताखाली बदली होऊनही अनेकजण घाण भत्ता घेत आहेत. बालाजी वायकर यांनी मागविलेल्या माहिती अधिकारातून ही माहिती पुढे आली आहे.

टिळक रोड क्षेत्राय कार्यालयांतर्गत घाण भत्ता घेणाऱ्या सेवकांची यादी, त्यांचा हुद्दा आणि ते सध्या कोठे काम करतात, आदी माहिती वायकर यांनी मागवली होती. यामध्ये 13 कर्मचाऱ्यांचा हुद्दा बिगारी आणि झाडूवाला असून ते सध्या अतिक्रमण, प्रभागसमिती, आरोग्य कोठी, स्थापत्य विभाग, टेंडरविभाग, टेलिफोन ऑपरेटर, गवनी, कचरा वाहतुक आदी विभागात काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जर हे कर्मचारी झाडण, ड्रेनेज सफाई आणि कचरा गोळा करण्याची कामे करत नसतील, तर यांना मिळणारा घाण भत्ता बंद होणे गरजेचे आहे. मात्र, अधिकारी आणि कर्मचारी मिलीभगत असल्याने संबंधित कर्मचारी वर्षानुवर्षे घाण भत्ता घेत असल्याचा आरोप वायकर यांनी केला आहे.

  • यादी मिळाल्यास भत्ता बंद – जगताप
    झाडण, ड्रेनेज सफाई आणि कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली इतर ठिकाणी झाल्यास किंवा ते अन्य कार्यालयात काम करत असल्यास त्यांचा घाण भत्ता बंद होणे गरजेचे आहे. मात्र 500 ते 600 कर्मचाऱ्यांना बढती मिळूनही आणि ते इतर कार्यालयात काम करत असूनही त्यांना घाण भत्ता मिळत असेल तर तो बंद केला जाईल. वास्तविक बढती मिळालेल्या संबंधितांचा घाण भत्ता बंद करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. संबंधीतांची यादी आल्यानंतर त्वरीत त्यांचा घाण भत्ता बंद केला जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button